Wednesday, April 7, 2010

किल्ले विजयदुर्ग – एक दर्शन

   ज्याचे गड त्याचे राज्य हे छ्त्रपतींचे स्फ़ुल्लींग. या जाणत्या राजाने गिरीदुर्गाइतकेच महत्व जलदुर्गांना दिले. या युगकर्त्याच्या दुरद्रुष्टीतच मराठा आरमाराचा पाया घातला. याची सुरवात “विजयदुर्ग” स्वराज्यात सामील करुनच त्यांनी केली. म्हणुनच विजयदुर्ग हा मराठा आरमाराचा पाया होय. शिवाजीराजाच्या या वास्तवात उतरलेल्या स्वप्नांची ओळख आपण करुन घेणार आहोत.
                               किल्ले हे संरक्षणाचे मर्म असते आणि म्हणुनच त्या भुगोलाला महत्व असते आणि मग इतिहास घडत जातो. मित्रहो विजयदुर्ग हा पश्चिम किनारपट्टीच्या संरक्षणातला महत्वाचा दुवा. कुठे आहे तो ?
                               आजच्या सिंधुदुर्ग जिल्हातल्या देवगड तालुक्यात सर्वात उतरेकडील टोकाला मोक्याच्या ठिकाणी तो गेली सुमारे आठशे वर्षे उभा आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर अरबी समुद्राच्या लाटा झेलत हा भक्कम जंजिरा एका प्रदीर्घ इतिहासाचा वारसा जपतोय.
                               उतरेकडे राजापुर तालुका आणि दक्षिणेकडे देवगड तालुका यांना विभागणारी सुमारे ४० ते ५० कि,मि. लांबीची “वाघोटण खाडी”आहे. तिच्या उतरेला आजचा रत्नागिरि जिल्हा दक्षीणेला सिंधुदुर्ग जिल्हा या खाडीच्या मुखाशी हा बुलंद गिरिदुर्ग उभा आहे.
                               कोणी बांधला ? त्याचि स्थित्यंतरे कोणती आपण थोडे इतिहासात डोकावु त्या खेरीज त्याचे महत्व लक्षात यावयाचे नाही.
                               कोल्हापुरचा शिलाहार राजाभोज याने इ.स. १९९३ ते इ.स. १२०६ या दरम्यान हा किल्ला बांधला असा इतिहास तज्ज्ञांचा कयास आहे. राजा भोजाने कोकण प्रांतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर हा किल्ला बांधला. भोज राजाने एकंदरीत सोळा किल्ले बांधले तेसच काहींची डागडुजी केलि. तेंव्हाच हा बाधंला . इ.स. १२१८ मध्ये देवगिरिच्या यादवांनी शिलाहाराचे राज्य पादाक्रांत केले. तेंव्हापासुन सन १३५४ पर्यंत तो यादवांकडे होता. यादवांचा विजयनगरच्या साम्राज्याकडुन पराभव झाल्यानंतर हा किल्ला सन १४३१ पर्यंत विजयनगर साम्राज्यात होता. सन १४३१ मध्ये बहामनी सुलतानशाहीने विजयनगरचा पाडाव केला. नंतर या किल्ल्यावर इ.स.१४८९ पर्यंत बहामनी अंमल होता.( बहामनी सुलतान अल्लाउद्दीन अहमदशहा याने विजयनगच्या राजाचा पराभव केला. ) इ.स.१४८९ ते इ.स. १५२६ च्या दरम्यान बहामनी राज्याचे तुकडे झाल्यानंतर कोकण प्रांतासह या किल्ल्याचा ताबा विजापुरचा आदीलशाहाकडे गेला. इ.स. १५२३ ते इ.स. १६२३ अशी सलग १२७ वर्षे तो आदिलषाही अंमलाखाली होता. त्याच्याकडुन छ्त्रपती शिवाजीमहाराजांनी तो जींकुन घेतला. नंतर सलग एकशे तीन वर्षे म्हणजे १४ फ़ेब्रु १७५६ पर्यंत तो मराठी सत्तेचा मानबींदु होता. १७५६ साली इंग्रज + पेशवे विरुध्द तुळाजी आंग्रे अशा वादग्रस्त आणि दुर्देवी लढाईत अल्पकाळ येथे युनियन जॅक फ़डकला. नंतर पुन्हा पेशव्यांचा अंमल १२ ऑक्टोबंर १७५६ रोजी सुरु होऊन. जरीपट्का फ़ड्कु लागला तो थेट इ.स. १८१८ पर्यंत जेंव्हा पेशवाई बुडाली आणि सारा भारतच इंग्रजी अंमलाखाली आला होता. मित्रहो, हि झाली राजवटींची स्थित्यंतरे या प्रत्येकाला विस्त्रुत इतिहासाचे संदर्भ आहेत. प्रस्तुत लेखाचा तो विषय नाही. फ़क्त भॊगोलिक परिसराशी संबंधित इतिहास आणि शिवाजी महाराजांचा विजय यांच्याशी संबधित माफ़क इतिहास किल्ला अधिक चांगला समजण्याच्या द्रुष्टीने महत्वाचा आहे.
                               शिवकालापुर्वी या किल्ल्याचे नांव “घेरिया दुर्ग” असे होते का? सध्याच्या विजयदुर्ग किल्ल्यापासुन सुमारे ५ कि.मि. वर “गिर्ये” नावाचे गाव आहे. याच्या शेजारील दुर्ग म्हणून गिरिया – गिर्ये – घेरिया असे अपभ्रंशित नांव पडले. सन १६५३ साली महाराजांनी हा किल्ला अदिलशाहीकडून जिंकून घेतला तेंव्हा सुरु होते “विजय संवत्सर” अशावेळी भगवा फडकला म्हणून छत्रपतींनी नांव ठेवले “विजयदुर्ग” येथेच पूर्ण डागडुजी करून महाराजांनी सन १६५३ मध्ये मराठा आरमाराची मुहुर्तमेढ रोवली. त्यांचा स्वराज्यनिष्ठ साथीदार इब्राहीम दौलतखान मराठी आरमाराचा प्रमुख होता त्याचे कर्तबगार साथीदार होते मायनाक भंडारी आणि सिव्ही मेस्ती आजचे दुर्गाचे स्वरुप हे छत्रपतींच्या कल्पकतेतून साकारले आहे. या आवश्यक ऎतिहासिक माहितीच्या पार्श्वभुमीवर चला तर आपण किल्ला पहावयास जाऊ.
                               विजयदुर्ग खाडी आपल्या उजव्या हातास आणि गाव डाव्या हातास आहे. आपण आता जिथे आहोत ती अलिकडे भर टाकुन केलेली जमीन आहे. वास्तवात खंदक आहे. यावर पुर्वी लाकडी पुल होता. या खंद्कातुन समुद्राचे पाणी फ़िरविले होते म्हणुनच हि पुर्वेकडिल बाजु उर्वरीत तिन्ही बाजुंप्रमाणे समुद्रानेच वेढलेली होती . म्हणूनच हा जलदुर्ग – जंजिरा या संज्ञेत मोडतो.
                               उजव्या बाजुस ब-या स्थितीत आणि डाव्या बाजुस बरासचा भग्न उजवीकडे थेट समुद्राशी भिडलेला रुंद तट या सर्वात बाहेरील तटबंदीचा “पड्कोट खुष्क”म्हणतात . या तटाच्या आत काही पाय-या चढुन जाऊ थोड्याशा सपाटीवर डावीकडे श्री हनुमानाचे मंदिर आहे. शिवशाहीच्या परंपरेप्रमाने हे शक्तीचे प्रतीक किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी असुन याची प्रतिष्ठापना स्वहस्ते शिवरायांनी केली आहे. मंदीर डाव्या हाताला ठेवुन काही पाय-या चढुन आपण वर जाऊ, एक छोटेखानी पण बळकट द्वार लागेल हा आहे “जिभीचा दरवाजा” म्हणजे आघाडीचे दार हा ओलांडुन आत गेल्यावर डाव्याबाजुस सुमारे तीस मीटर उंचीची बळकट बुरुजांनी युक्त तटबंदी तर उजव्याबाजुस कमी उंच अंतर्गत तट्बंदी त्यापलीकडे खाली “पड्कोट खुष्क”त्याच्यापडीकडे खाडी दिसते. आता आपण दगडांनी बंदीस्त केलेल्या एका छोट्या रस्त्यावरुन पाय-यांच्या दिशेने चाललो आहोत. पाय-या चढताना त्या डावीकडे वळतात . दोन भक्कम आणि उंच बुरुजांपासुन आपण थेट भक्कम महाद्वारासमोर उभे आहोत. हे किल्ल्याचे एकमेव आणि मुख्य प्रवेशद्वार होय. दोन बुरुजांनी सुरक्षित केलेले गोलाकार वळसा घालुन प्रवेश करावे लागणारे हे प्रवेशद्वार आहे. यास गोमुख बांधणी म्हणतात. आत प्रवेश केल्यावर डाव्या व उजव्या बाजुस संरक्षकांच्या देवड्या लागतात. डावीकडील देवडीत एक तोफ़ – तोफ़गोळा – ऎतिहासिक माहिती व किल्ल्याचा नकाशा असलेला फ़लक आहे. दरवाज्यावर पेशवेकालीन लाकडी बांधकाम पहावयास मिळते. दरवाजा ओलांडुन किल्ल्याच्या मुख्य प्रकारात आलो आहोत. तोफ़ गोळ्यांनी मर्यादीत केलेल्या छोट्या रस्त्यासमोर बैठी इमारत दिसते ती आहे सध्याची पोलीस चॊकी व पुरातत्व खात्याची कचेरी आपण आता डाव्या बाजुस जाऊ, कमानी सारखा दरवाजा असणारी एक बंदीस्त इमारत यास खलबतखाना म्हणतात. गुप्त बैठकांची म्हहत्वाच्या निर्णयाची ही जागा होय. तसेच पुढे काही पाय-या चढुन तटावरुन एक भग्न इमारतीच्या अवशेषात आपण उभे आहोत. समोर दिसतोय ध्वजस्तंभ आणि चॊथरा उजव्या बाजुला देवडीत आहे, शंकराचे स्थान , हेच ग्रामदैवत रामेश्वराचे मुळ्स्थान परधार्मियांचे आक्रमनामुळे रामेश्वर येथुन विस्थापित झाल. आज तो गिर्ये गावी पेशवेकालीन जीर्णोद्धारीत मंदीरात विराजमान आहे. ( ते रामेश्वर मंदीरही पहाण्यासारखे आहे. उल्लेख इतरत्र ) आपण उजवीकडील तट्बंदीवरुन जाऊ शकतो . पण आपल्याला किल्ल्याच्या मुख्य प्रकारात बरेच महत्वाचे पहायचे आहे. मग तटबंदी पाहु. पाय-या उतरुन चॊकी डाव्या हातास महाद्वार उजव्या हातास ठेवुन जाऊ. उंच भिंतीच्या दुमजली भव्य अशी सदर लागते. प्रवेशद्वारातुन आंत गेल्यावर पुन्हा डाव्या हातास दोन दरवाजे असलेली मुख्य सदर लागते. ही इमारत किंवा इतर सर्वच इमारतींमध्ये दगडी बांधकाम भक्कम लाकडी तुळ्यांचा वापर हे बांधकामाचे वैशिष्ट्य पहाव्यास मिळते. सदरेसमोर प्रशस्त उतरुन गेल्यावर उद्धवस्त वस्तीचे अवशेष आढळतात. येथे खासेवाडे, आंग्रे यांचा वाडा, इतर सेनाधिका-यांचे असावेत . इथे एक पुरातन वटव्रुक्ष आहे. या खालीच भवानी मातेची मुळमुर्ती कित्येक वर्षे दुर्लक्षित पडली होती. ( उल्लेख इतरत्र येणार आहे.) याच्या समोर तिहेरी तटबंदीतिल सर्वात आतील संरक्षक तट्बंदी सुरु होती . थोडया पाय-या चढुन आपण एका दारातुन तट्बंदीवर प्रवेश करु. आपण ऎका भग्न अनेकमजली इमारतीत उभे आहोत. बाहेरुन हा बुरुज वाटतो. यांच्या गवाक्षातुन समोरील खाडी दुरपर्यंत स्पष्ट दिसते. या वास्तुच्या डाव्या उजव्या बाजुला दारातुन बाहेर पडु. तटाला असणा-या पाय-या उतरुन खाली येऊ. समोर दुस-या तटबंदीला भिडलेले दारुचे कोठार दिसते. ही भक्कम दगडी चुनेगच्चीयुक्त इमारत आंग्रे विरुध्द इंग्रज + पेशवे यांच्या इ.स. १७५६ युध्दात निर्णायक ठरली अकल्पितपणे आतील दारुसाठ्याने पेट घेतला आणी आतील मारगिरी हतबल झाली. वन्ही तांडव इतके तीव्र होते. आपण मघाशी ज्या भग्न इमारतीतुन उतरलो ती आणि आजुबाजुची प्रचंड दगडी तटबंदी तप्त लोहाप्रमाणे लाल झाली होती. दारु कोठाराच्या डाव्याबाजुस तटाखालुन एक उत्तम भुयार जाते. या वैशिष्ट्यपूर्ण भुयारात आपण प्रवेश करु. दोन्ही बाजुला असंख्य पुरातन तोफ़गोळे पडलेले आहे. भुयार संपुन काही पाय-या चढुन आपण सर्वभुत “खुबलढा-तोफ़ाबारा”या थेट समुद्राला भिडलेल्या ३६ मी.उंचीच्या लढाऊ बुरुजावरुन येतो. किल्ल्यावरील आक्रमनाची ही प्रमुख जागा आहे. तोफ़ांच्या मारगिरीची मोठी छिद्रे . टेहळणी चॊथरे, पाण्याची डोणी यांनी युक्त हा वैशिष्ट्यपुर्ण बुरुज आहे. आपण आता पुन्हा खाली उतरुन भुयारातुन परत किल्ल्याच्या मुख्य प्रकारात येऊ. सदर ओलांडुन राज रस्त्याने सदर उजव्या हातास ठेवुन साधारण पश्चिमेकडे जाण्यास लागु. सदरेला लागुन उत्क्रुष्ट अशी घोड्याची पागा आहे. तर डाव्या बाजुला विहीर आणि एक तुळशी व्रुदांवन झाडीत दिसते. थोडे पुढे गेल्यावर उजव्या हातास सदरेपलीकडे एक भग्न वास्तु आहे. यास “पिराची सदर”म्हणतात . पुन्हा राजरस्त्यावर येऊन चालावयास लागु. डाव्या बाजुस उंच, भक्कम अंतर्गत तटबंदीचा भाग दिसतो. आपण या वैशिष्ट्यपूर्ण तटबंदीच्या जवळ जाऊ हा सर्वात आतील गोलाकार संरक्षक तटबंदीचाच भाग आहे. पण आपण जिथे उभे आहोत तिथे खाली थेट जमिनीत उतरलेल्या दगडी पाय-या आहेत. या पाय-या आपल्याला दीर्घ आणि अचंबित करणा-या एका भव्य भुयाराला तोंडाशी घेउन जातात. हे भुयार येथेन सुरु होते आणि तेथुन एक, दीड कि.मी. वर असणा-या सरदार धुळपांच्या वाड्यात उघडते!! त्याचा मार्ग दोन्ही बाजु बंद असल्यामुळे अज्ञात आहे. पण समुद्राच्या तो इतका जवळ आहे. निदान भरतीवेळी तरी समुद्राखालचा बोगदा म्हणता येईल. आपण आता पुन्हा रस्त्याने साधारण वायव्येकडे जावयास लागु. आपल्या उजव्या हाताला झाडीत लपलेली एक छोटी टेकडी दिसते हीच ती प्रसिद्ध निशान टेकडी. मित्रहो याच टेकडीवर किल्ला जिंकल्यावर स्वहस्ते प्रत्यक्ष छ्त्रपतीनी स्वराज्याचे भगवे निशाण लावले. जणु विजय संवत्सरात विजयदुर्ग विजय पताका फ़डकली. मुळ किल्ला या टेकडीच्या आसपासच्या सुमारे पाच एकरांवर वसला होता. आता तो पसरला आहे. शिवस्पर्शाने पुनीत झालेल्या मातीस वंदन करुन आपण पुढे सरकु. समोरच भग्न मंदीराचे अवशेस दिसतात. ५७ फ़ुट लांब आणि ४० फ़ुट रुंद असे हे “भव्य भवानीमाता मंदीर”आहे. सदरे समोरील प्राचीन वटव्रुक्षाखाली दुर्लक्षीत पडलेली भवानी माता, हे तिचे मूळस्थान (हल्लीच सरपंचाना झालेला द्रुष्टान्त? गावक-यानां भावना, पुरातत्व खात्याचे लेले, अभ्यासक श्री.राजेंद्र परुळेकर यांच्या प्रयत्नातुन श्री मूर्तीची विधिवत मूळजागी प्राणप्रतिष्ठा केली आहे) मंदीर ओलांडुन पुढे जाऊ. उत्तम सिमेंटने गुळगुळीत केलेले दगडी ओटे दिसतील . यालाच “साहेबाचे ओटे”म्हणतात. मित्राने आपण उभे आहोत त्या जागेचे आणि ओट्याचे जागतीक महत्व आहे. कारण याच जागेवरुन “हेलियम”या मूलद्रव्याचा शोध लागला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्याचे असे झाले सन १८९८ साली एक खग्रास सुर्यग्रहण झाले. संपुर्ण जगात सुर्य आणि प्रुथ्वी यातील सर्वाधीत कमी अंतर असणारी ही जागा होती. त्यामुळे सुर्यग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी त्याचा आगाऊ अंदाज वर्तवणारा अमेरीकन शास्त्रज्ञ “जॅनसन व लॅकिअर”यांनी इथे दुर्बिणी लावल्या होत्या तेंव्हा निरीक्षणे करतांना त्यांना सुर्याभोवती पिवळे वलय आढळले. तेंव्हा त्याचा अर्थ बोध झाला नाही. पण नंतर अधिक संशोधन करतांना, स्पेक्ट्रोग्राफ़ घेतल्यावर लक्षात आले तो एक वायु आहे. त्याला म्हटले “हेलियम”म्हणजे हेलिऑस याचा अर्थ सुर्य. सुर्यावर असणारे अथवा आढळणारे म्हणुन “हेलियम”हे एक वायुरुप मुलद्रव्य असुन त्याच्या शोधाचे जनकत्व लॅकिअर आणि फ़्रॅंकलंड यांचेकडे जाते. हेलीअम हे नाव त्यानीच सुचविले म्हणुनच विजयदुर्गास हेलिअम गॅसचे “पाळणाघर”म्हणतात. आपण आता आपल्या डाव्याबाजूला दिसणा-या अप्रतिम बांधणीच्या चॊकोनी जलाशयाकडे जाऊ. तळापासुन वरपर्यंत बांधुन काढलेला हा तलाव किल्ल्यातील गेल्या पाण्याचा मुख्य साठा होय असे म्हणतात. याच्या तळाशी शिशाचा थर होता असे सांगतात. तळापर्यंत पाय-या असणारा जलाशय आज मात्र पूर्ण कोरडा आहे. त्याच्या अलीकडेच एक छोटेखानी जलाशय आहे. आपल्यासमोर जी भक्कम वास्तु उभी आहे. ती आहे “धान्याचे कोठार”आत उतरुन जाऊ स्वच्छ मोकळी हवा, भक्कम चुनेगच्ची बांधकाम. धान्य साठविण्यास योग्य वातावरण आपल्या लक्षात येईल. कोठारामधुन बाहेर आल्यावर किंचितपुढे डाव्या हातास एक खोलीवजा बांधकामासमोर मध्यम आकाराची तोफ़ पडली आहे. त्यास म्हणतात. “जखिणीची तोफ़”हेच नांव का? काहीही संदर्भ नाही.
                               हे झाले किल्ल्याचे अंतरंग आता आपणास पहावयाचे आहे. समुद्राला भिडलेला भक्कम तट आणि त्यावरील वैशिष्ट्यपुर्ण बांधकामे. सुरुवात आपण ध्वजस्तभांपासुन करु ( ज्याचे वर्णन पूर्वी केलेले आहे.) नंतर लागते पोलीस कचेरी / पुरातत्व कचेरी मागील ढासळत चाललेली तटबंदी नंतर लागते तटावरील तीनमजली पडकी वास्तु. त्याच्या शेजारी आहे नरबुरुज याचा अर्थ पुर्णपणे भक्कम आणि भरीव बुरुज. नरबुरजावरुन बरेच पुढे गेले की प्रशस्त मोकळ्या जागेत समुद्राला भिडुन तटावर असणारी एक वास्तु आपले लक्ष वेधुन घेते. यास “माडी”असे म्हणतात. हा असावा राणीवसा सर्व सुखसोयी तसेच संडास / बाथरुम उत्तम गवाक्ष, गोलाकार बसविलेले सज्जा यांनीयुक्त ही वास्तु आहे. पुन्हा इथेही दगडात लाकडी खांब / तुळ्यांचा वापर आपणास पहावयास मिळतो. या वास्तुच्या गवाक्षातुन समुद्रकिनारा, पश्चिम क्षितीज याचे अप्रतिम दर्शन होते. ही किना-याकडिल बाजु असल्यामुळे तटबंदी अधिक उंच आहे. येथुन पुढे सुरु होतो. थेट समुद्राला भिडलेला बुलंद तट. एखादे मोठे वाहन जाऊ शकेल अशी आतील भक्कम भिंत मारगिरीसाठी विशिष्ट लहान-मोठ्या, एकेरी-दुहेरी-तिहेरी जागा यांचे आकार आणि कोन वेगवेगळे पहावयास मिळतील. जितका कोण तीव्र व खाली तितका पल्ला कमी, सरळ व मोठा तितका पल्ला लांब. यास “जंगी”असे म्हणतात. प्रत्येक बुरुजावरील पाण्याची डोणी ठिकठिकाणी शॊचकुपे, स्नानग्रुहे आदी या तट्बंदीची वैशिष्ट्ये. बुरुजाची नावे पाहुया! १) गणेश बुरुज २) राम बुरुज ३) हनुमंत बुरुज ४) दर्या बुरुज ५) तुटका बुरुज ६) शिखरा बुरुज ७) शिंदे बुरुज ८) शहा बुरुज ९) व्यंकट बुरुज १०) सर्जा बुरुज ११) शिवाजी बुरुज १२) गगन बुरुज १३) मनरंजन बुरुज १४) गोविंद बुरुज १५) सदाशिव बुरुज १६) खुबलढा बुरुज १७) घनची बुरुज १८) पाण बुरुज १९) पड्कोट बुरुज २०) नरबुरुज
                               हे बुरुज पहात तटबंदीवरुन फ़ुरताना बारकाईने पहा. तटाखाली कोठारे आहेत. बाहेर मुद्दाम म्हणुन टाकलेला मोठमोठया धोंडी आहेत. हेतु हा सतत येणा-या समुद्राच्या लाटा या धोंडीवर आपटुन फ़ुटाव्यात. पर्यायाने लाटांचा तट आणि बुरुज यावरील मारा सिमीत व्हावा आणि किमान हानी पोहोचावी.
                               आणि एक वैशिष्टपुर्ण गोष्ट अशी. अंतर्गत आणि बाह्य तटबंदीच्या मध्ये तलाव व धान्य कोठार यांच्या मागील बाजुस एक अप्रतिम गोड्या पाण्याची विहीर आहे. गेली अंदाजे ८०० वर्षे हा किल्ल्यातील गोड्यापाण्याचा स्त्रोत अव्याहत आहे. मित्रहो या विहिरीपासुन फ़क्त तट्बंदी ओलांडली की सर्व बाजूंनी खा-या पाण्याचा विशाल सागर आहे............ याच्याजवळ किल्ल्यातील बांधकामासाठी लागणारी चुन्याचे घाणी आहे. ८०० वर्षे टिकलेल्या बांधकामाचे चिरे याच घाणीतील चुन्याने साधले आहेत!........
                               मित्रहो इ.स.१६५३ साली युगकर्त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या दुर्गावर मराठा आरमाराची मुहूर्तमेढ रोवली त्या ऎश्वर्य संपन्न इतिहासाचा प्रकार पाहुन आपण आता प्रवेशद्वाराशी उभे आहोत. इथल्या प्रत्येक कणाला सुवर्णाचे मोल आहे. मनात आपोआप निश्चय होतो हा स्फ़ूर्तीदायक इतिहास जपला पाहिजे. पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणुनच आपोआप गर्जना बाहेर पडते.

0 comments:

Post a Comment